भीषण अपघात…… ट्रकने एसटी बसला चिरडले: दोन प्रवासी ठार, 15 जखमी

0
59

*भीषण अपघात… ट्रकने एसटी बसला चिरडले : दोन प्रवासी ठार, 15 जखमी*

जळका फाट्याजवळ दुर्घटना •
तालुका प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका फाटा परिसरात आज गुरुवार (दि. ४ डिसेंबर २०२५) रात्री आठच्या सुमारास एसटी बस व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवासी जागीच ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.

चंद्रपूरहून यवतमाळकडे जाणारी एसटी बस (क्र. MH 40 Y 5782) आणि करंजीकडून वणीच्या दिशेने येणारा भरधाव ट्रक आमनेसामने धडकल्याने अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकने बसचा पुढील अर्धा भाग अक्षरशः चिरत नेला.

या अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मोठी मदत केली. सर्व जखमींना मारेगाव व करंजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.