बाबासाहेबांच्या संविधानामुळे मूलभूत हक्काचा अधिकार मिळाला

0
53

🔴 बाबासाहेबांच्या संविधानामुळे मूलभूत हक्काचा अधिकार मिळाला – ॲड. कुमार मोहरमपूरी
🔴 मेंढोली येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी
____________
तालुका प्रतिनिधी :

वणी : “वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांनी ग्रासलेल्या देशात भारतीय बहुसंख्य असलेल्या बहुजन समाजाला अनेक मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. इंग्रजांनी आपल्या गरजांसाठी भारतातील जनतेला नाईलाजाने शिक्षण देणे सुरू केले. ह्या शिक्षणाचा वापर करून महात्मा फुले व सावित्रीमाई यांनी वर्णधिष्ठित व्यवस्थेत नाकारलेल्या शूद्र जनतेला शिक्षणाची दारे मोकळी करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फुले यांना गुरु मानून ह्या शिक्षणाचा संधीचा सदूपयोग करीत फार कमी वेळात उपाशीपोटी राहून आपले उच्च शिक्षण विदेशात जाऊन घेतले. अशा कठीण प्रसंगी गरिबीमुळे आपल्या मुलांना सुद्धा वाचवू शकले नाही. तरी त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून दबलेल्या, पिचलेल्या शूद्रांना वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने केले, जगातील सर्वात मोठे, लिखित संविधान लिहून भारतातील बहुसंख्य बहुजन समाजाला मूलभूत हक्क प्राप्त करण्याचे शस्त्र दिले. त्यामुळे बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळे मूलभूत हक्काचा अधिकार मिळाला.” असे रोखठोक प्रतिपादन मेंढोली येथे आंबेडकर जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी यांनी केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मेंढोली येथील सरपंच विनायक ढवस होते तर प्रमुख वक्ते म्हणून कॉ. ॲड. कुमार मोहरमपूरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावातील एकनाथ नालमवार, नत्थु खामणकर, ऋषी कुळमेथे, अरुण चिंचोलकर, हरिभाऊ चिकराम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड. मोहरमपूरी यांनी खंत व्यक्त करीत म्हणाले की, ” जगातील सर्वात सुंदर संविधान बाबासाहेबांनी देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी योग्य रित्या होत नसल्याने देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही भारतातील नागरिकांचा मूलभूत गरजा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. आजही ८० कोटी लोकांना धान्य मोफत द्यावे लागत आहे.”

वणी येथून १५ किमी वर असलेल्या असलेल्या मेंढोली या गावात बौद्ध, हिंदू व आदिवासी समुदायांनी एकत्र येत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रॅली व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी केली.

या कार्यक्रमाचे संचालन भास्कर नगराळे यांनी केले. आभार कार्यक्रमाचे आयोजक जयप्रकाश तेलंग यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नानाजी पुसाम, नालंदा तेलंग, बबिता खाडे, मंगेश नालमवार, शंकर नालमवार, संजय वालकोंडे यांनी अथक परिश्रम घेतले.