*पाटणआई देवस्थान, माथार्जुन येथे पोलीस पाटील दिनानिमित्त स्नेह मिलन*
झरी जामणी : प्रतिनिधी – योगेश मडावी
झरी जामणी तालुक्यातील पाटण पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त स्नेह मिलन सोहळा, मार्गदर्शन शिबिर व निरोप समारंभ पाटणआई देवस्थान, माथार्जुन येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे हे होते,तर पीएसआय नागोराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय भोयर, माथार्जुन ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र कायतावर तसेच पत्रकार योगेश मडावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी पोलीस पाटीलांची गावपातळीवरील महत्त्वपूर्ण भूमिका, प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून असलेले योगदान तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी प्रशासनाशी समन्वय राखून समाजात शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस पाटीलांनी सक्रिय भूमिका बजावावी,असे आवाहन केले.तर पीएसआय नागोराव जाधव यांनी पोलीस पाटीलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त पोलीस पाटील विजय भोयर (डोरली) व त्यांच्या पत्नीचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी,सर्व पोलीस पाटील तसेच पोलीस प्रशासनातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




