*दहिफळ शाळेत 101 वृक्ष लागवडीचे संकल्प पूर्ण*

0
199

एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू. मोठे झाल्यावर त्याच्या, सावलीत खेळू…

या अनंत भावे यांच्या कवितेनुसार जिल्हा परिषद मराठी शाळा दहिफळ येथील प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेच्या सभोवतालचा परिसर वृक्षमय केले आहे.

नेर तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगराळ, मुरमाड जमिनीवर हिरवेगार शाळेचे स्वप्न रंगवण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक बालाजी मुद्दमवार यांनी साकारतना दिसत आहेत. आधीपासूनच वृक्ष संवर्धनाची आवड असलेले बालाजी सर, ज्या शाळेत जातील तेथील परिसर वृक्षमय करीत आलेले आहेत. दोन वर्षा आधी दहिफळ गावात रुजू झाल्यापासून शाळेच्या संपूर्ण परिसरात देशी वृक्ष ज्यामध्ये कडुलिंब, करंज, आंबा,गुलमोहर,शेवगा, वड,पिंपळ, कदम, जांभूळ अशा अनेक वृक्षांची लागवड शाळेमध्ये केलेली आहे.. मागील सत्रात 51 देशी झाडे लावली असून ती अद्यापही चांगली वाढलेली आहे. तर या सत्रात 2025-26 मध्ये 101 झाडांची रोपे संगोपन करून शाळेमागील परिसरात लावली आहेत. स्वतः, शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी झाडे संगोपनाची जबाबदारी स्वीकारत झाडाची काळजी घेणे सुरू आहे. मुरमाड जमीन, पाण्याची कमतरता, यातूनही मार्ग काढत त्यांची वृक्ष संवर्धन कार्य सुरू आहे.

एकेकाळी उदासीन असलेली शाळा आज वृक्ष- फुलझाडांनी भहरलेली दिसत आहे. अनेक देशी वृक्षासह सुंदर फुलझाडे, आकर्षक खेळणी, संगणक शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण, परसबागातील पौष्टिक भाजीपाला, शासनाच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन बक्षीस मिळवणारी शाळा म्हणून परिसरात प्रसिद्धी पावत आहे. गावातील पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेचा विश्वास वाढून सतत दोन वर्षापासून शाळेची पटसंख्या वाढताना दिसत आहे.

आधुनिक शिक्षणासह निसर्ग संगोपनाच्या कार्यात शाळेचे शिक्षक सुशील राठोड आणि किशोर मुंडे यांचेही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत आहे.. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील शिक्षकाचे मेहनतीचे परिसरात कौतुक होत आहे…