*इजासन रस्त्यावर झुकलेल्या झुडुपांमुळे अपघाताची शक्यता*
*जि. प. बांधकाम विभागाला दिले निवेदन*
सैदाबाद बसथांबा ते इजासन (गोडगाव) गावापर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडेझुडुपे वाढलेली आहेत. झुकलेल्या वृक्षवेलींमुळे रस्ता नीट दिसत नाही. परिणामी या रस्त्यावर प्रवास करताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून रस्त्याच्या कडेची झुडुपे तोडण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली आहे.
वणी तालुक्यातील इजासन (गोडगाव) रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडेझुडुपे सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक वर्षांपासून तोडलेली नाहीत. परिणामी वृक्षवेलींमध्ये विजवाहक तारा लटकून वाहतुकीच्या रस्त्यावर लोंबकळत आहेत. अनेकदा मालवाहू वाहनांमध्ये झुकलेल्या वेली अटकतात. शेळ्यांना चारा तोडण्यासाठी शेळीपालक झाडांवर नकळतपणे चढतात. अशा वेळी विजेचा धक्का लागून अनुचित घटना घडण्याची शक्यता दिसून येत आहेत. म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे झुडुपे तोडण्याची मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय बलकी, ग्रामपंचायत सदस्य संकेत मोहिते, पत्रकार योगेश तेजे, सुरेश खामनकार, दिवाकर काकडे आदी उपस्थित होते.




