केस्लापुर : नागोबा देवस्थान समितीची बैठक ! गंगाजल आणण्याच्या पवित्र परंपरेवर चर्चा

0
173

केस्लापूर : नागोबा देवस्थान समितीची बैठक; गंगाजल आणण्याच्या पवित्र परंपरेवर चर्चा

केस्लापूर | प्रतिनिधी यवतमाळ योगेश मडावी

तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील केस्लापूर येथे नागोबा देवस्थान समितीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत देवस्थानाचे आगामी धार्मिक उपक्रम, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा तसेच एकूण व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावकरी, मेश्राम कुटुंबीय तसेच सोयरे-धायरे यांच्या उपस्थितीत देवस्थानाचा कारभार अधिक सुयोग्य व शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

या बैठकीत नागोबा देवस्थानाशी निगडित गंगाजल आणण्याच्या प्राचीन व पवित्र परंपरेवर विशेष भर देण्यात आला. परंपरेनुसार दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी झारी म्हणजेच कलश घेऊन भाविक गोदावरी नदीकडे पायी प्रवास करणार आहेत. गोदावरी नदीच्या (अस्तनमळग) या पवित्र स्थळावरून गंगाजल आणले जाते.

या वेळी मेश्राम परिवारातील सुमारे ९० ते १०० भाविक एकाच रांगेत, मुंग्यांच्या रांगेप्रमाणे पावलावर पाऊल टाकत, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गोदावरी नदीकडे मार्गस्थ होतात. सुविधा उपलब्ध असतानाही कोणत्याही प्रकारच्या सुख-सुविधांचा वापर न करता,पायात चप्पल न घालता हा संपूर्ण प्रवास केला जातो. सात गावांतून प्रवास करत मुक्काम करीत हे भाविक पवित्र व स्वच्छ गंगाजल कलशात आणतात.

विशेष म्हणजे, गोदावरी नदीचे पाणी कलशात घेताना सूर्योदय होण्यापूर्वीच हा विधी पूर्ण केला जातो. त्या वेळेपर्यंत एकही पक्षी, एकही जनावर किंवा एकही मनुष्य त्या पाण्याला स्पर्श करत नाही किंवा ते पाणी पित नाही, अशी कठोर धार्मिक शिस्त पाळली जाते. त्यामुळे कलशात घेतलेले जल अत्यंत स्वच्छ, निर्मळ व पवित्र ‘गंगाजल’ मानले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया नागोबा देवस्थानाशी निगडित श्रद्धा, संयम व परंपरेचे प्रतीक असून, आजही ही परंपरा तितक्याच निष्ठेने व नियमबद्धतेने जपली जात आहे. या परंपरेमुळे भाविकांमध्ये श्रद्धा व एकतेची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

दरम्यान, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी केस्लापूर येथील नागोबा देवस्थानात श्रीशेका नागोबा पेन महापूजा रात्री ९ वाजता भक्तिभावाने संपन्न होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या महापूजेसाठी मेश्राम कुटुंबीय,गावकरी तसेच सोयरे-धायरे मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.