हल्ला म्हणजे लोकशाही संपवण्याचा डाव

0
65

हा हल्ला म्हणजे लोकशाही संपवण्याचा डाव – राजू निमसटकर
“””””””””””””””””””””””””””””””””””
* वणी येथे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचा तीव्र निषेध.
* आरोपीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा निवेदनातून मागणी.
“””””””””””””””””””””””””””””””””””
वणी (यवतमाळ) : देशाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा वणी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, तालुका वणी शाखेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या हल्ल्याला ‘लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव’ संबोधून, आरोपीवर राष्ट्रद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजु निमसटकर यांनी केली असून
दिलेल्या एका निवेदनाद्वारे मनुवादी सत्ताधारी व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढविला. सरन्यायाधीशावरील झालेल्या निंदनीय घटनेचा निषेध करणारे निवेदन येथील मा. तहसीलदार वणी यांच्या मार्फत भारत सरकारकडे पाठवीण्याची मागणी करण्यात आली. संविधानावर केलेला थेट हल्ला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठावर खुद्द सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, तो आपल्या संविधानावर आणि न्यायदानाच्या प्रक्रियेवर केलेला थेट हल्ला आहे. या घटनेमुळे लोकशाही संस्थांचा आदर करण्याची भावना नष्ट करण्याचा प्रयत्न दिसतो. ही घटना भारतीय लोकशाहीला काळिमा फासणारी असून, न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी भीतीही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, तालुका वणी यांनी आरोपी (वकील राकेश किशोर) याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी, सार्वभौम धर्मनिरपेक्ष राष्ट्र अधिक मजबूत करण्यासाठी अशा ‘मनुवादी व्यवस्थेचा डाव हानून पाडावा’ असे आवाहन करण्यात आले. म्हणूनचं, एकजूट होऊन बाबासाहेबांचा विचार जनमानसात पेरा असे पदाधिकाऱ्यांनी निवेदनानंतर बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हे केवळ ‘हिमनगाचे टोक’ आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. भविष्यात येणाऱ्या पिढीला सुरक्षित समाज देण्यासाठी, ‘प्रतिक्रियावादी, मनुवादी व्यवस्थेला सत्तेपासून दूर’ केले पाहिजे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. किमान बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेल्या समाजाने तरी एक संघपणे बाबासाहेबांचा विचार जनमानसात पेरणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या मातृ संघटनांनी पुढाकार घ्यावा. राजकीय सत्ता संपादित करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा ‘वंचित बहुजन आघाडी’ हा एकमेव पक्ष आहे हे मान्य करून पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजु निमसटकर, जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे वणी तालुका सरचिटणीस प्रवीण वनकर, तसेच डॉ. आनंद वेले, विलास तेलतुंबडे, मिलिंद नगराळे, आशिष पाझारे, तन्मय लामसोंगे, प्रणिता ठमके, किशोर ठमके, किशोर मुन, शुभांगी नगराळे, वैशाली गायकवाड, नंदिनी ठमके, कविता खैरे, अर्चना नगराळे, अंकित पाझारे, रौनक लामसोंगे, प्रतिभा रामटेके, तुळसा नगराळे, कविता घायवन, सुनिता ठमके, वैशाली पाटील, घनश्याम ठमके, एड. चंदू भगत, योगीराज भरणे, डॉ. प्रशिक बर्डे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“”””””””””””””””””””””””””””””””””””